पालघर, ता. ६ (वार्ताहर) : दहीहंडीचा उत्साह संपत नाही तोच पालघरमध्ये खासगी रुग्णालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोविंदा पथकातील जखमी सदस्याच्या उपचारावरून झालेल्या वादात डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, रुग्णालयाची तोडफोड करण्याची धमकी आणि एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित, शहरप्रमुख राहुल घरत, नगरसेवक नीलम संखे यांच्यासह १७ जणांविरुद्ध पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर शहरातील माहीम महामार्ग परिसरातील राजयोग मॉलमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कार्यालय आहे. शनिवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकातील सदस्य थर लावताना जखमी झाल्यानंतर पाच जणांना जवळील रिलीफ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाच्या डोक्याला व मणक्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅनसह पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. उपचाराचा खर्च सुमारे २० हजार रुपये असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यापैकी १० हजार रुपये आयोजकांकडून जमा करण्यात आले.

मात्र, रुग्णाला सोडण्यावरून आणि सीटी स्कॅनच्या आवश्यकतेवरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर कुंदन संखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व समर्थक रुग्णालयात दाखल झाले. ‘सीटी स्कॅन कशासाठी?’ अशी विचारणा करण्यात आली. वैद्यकीय कारणास्तव तपासणी आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर वातावरण तापल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत असल्याचे सांगण्यात आले.
डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
डोंबिवलीतील रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण झाल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच पालघरमध्येही डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात घुसून अरेरावी, मारहाण व तोडफोडीच्या धमकीचे आरोप गंभीर असल्याने या प्रकरणाच्या पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.
१७ जणांविरुद्ध गुन्हा
रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर पालघर पोलिसांनी १७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील दुखापत करणे, अपमान व धमकी, अनधिकृत प्रवेश, गैरकायद्याची मंडळी जमविणे आदी कलमांसह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि संस्था अधिनियम, २०१० मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी आरोप फेटाळण्याची भूमिका घेतली आहे. गोविंदा पथकातील किरकोळ जखमी रुग्णांना रुग्णालयातून सोडले जात नसल्याने वाद निर्माण झाला, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. रुग्णांच्या उपचाराच्या मुद्द्यावरूनच पदाधिकारी रुग्णालयात गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
