Uncategorized

बोईसरमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकची पादचाऱ्याला धडक

बोईसर, ता. १९ : बोईसर पूर्वेकडील अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटलसमोरील पुलाजवळ भरधाव गॅस वाहतूक करणाऱ्या सहा चाकी ट्रकने पायी चालत जाणाऱ्या तरुणाला मागून धडक दिल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात रोहित विष्णू टेंबे (वय २१) हा तरुण जखमी झाला. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित टेंबे हा १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.१० वाजता मित्र आर्यन पांडे याच्यासोबत बोईसर-चिल्हार रोडने अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटलजवळील फिटनेस जिमकडे पायी जात होता. अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटलसमोरील पुलाजवळ ते पायी जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीच्या सहा चाकी ट्रकने (एमएच ४६ बीबी ६६७२) रोहितला जोरदार धडक दिली.

या धडकेत रोहितच्या डोक्याला तसेच दोन्ही खांद्यांना दुखापत झाली. त्याच्यासोबत असलेल्या मित्राने आणि घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर रोहितने १५ ऑगस्ट रोजी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून बोईसर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोईसर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *