Uncategorized

पालघरच्या प्रश्नांवर निलेश सांबरे आक्रमक; पालकमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

पालघर, ता. २३ : पालघर जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षा, अवैध व्यवसाय, पाणीपुरवठा योजनांमधील कथित आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय भ्रष्टाचारासह आदिवासी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी निलेश सांबरे यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात निवेदने सादर केली. या निवेदनांची दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

बोईसर येथील विराज प्रोफाइल कंपनीतील कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सांबरे यांनी केली. या प्रकरणात कंपनीचे संचालक, संबंधित अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, गुटखा, मटका आणि अवैध दारूविक्री व वाहतुकीचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. सिल्वासामार्गे होणाऱ्या अवैध दारूच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांसाठी मंजूर निधीचा विनियोग, कामांचा दर्जा आणि अपूर्ण योजनांबाबतही निवेदनात मुद्दे मांडण्यात आले. आवश्यक पात्रता व अनुभव नसलेल्या ठेकेदारांना कामे दिल्याच्या तक्रारींची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. तसेच निकृष्ट आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, विविध प्रशासकीय विभागांमधील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी. आदिवासी शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही सांबरे यांनी केली.

या निवेदनांवर पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावणे, विकासकामांमध्ये पारदर्शकता राखणे आणि शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे निलेश सांबरे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *