दोन्ही आयोजकांचे मंडप जवळ असल्याने वादाची शक्यता; पोलिसांच्या पत्रानंतर एमआयडीसीची कारवाई

बोईसर, ता. १० : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील खैरेपाडा येथील भूखंड क्रमांक OS-४६/२ वर नवरात्रोत्सवासाठी देण्यात आलेली परवानगी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रादेशिक कार्यालयाने शनिवारी (ता. १०) रद्द केली. दोन्ही गरबा आयोजकांचे मंडप जवळजवळ असल्याने वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर एमआयडीसीने हा निर्णय घेतला.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील खैरेपाडा येथील संबंधित भूखंडावरील ६५०० चौरस मीटर क्षेत्र नवरात्रोत्सवासाठी ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी रासरंग दांडिया आयोजकांनी १ आणि ५ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यानुसार आवश्यक शुल्क वसूल करून एमआयडीसीने ९ ऑक्टोबर रोजी अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली होती.
मात्र, बोईसर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी १० ऑक्टोबर रोजी एमआयडीसीला पत्र पाठवून या ठिकाणी दोन्ही आयोजकांचे मंडप जवळ असल्याने गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर वादात होऊन गुन्हे दाखल होण्याचीही शक्यता असल्याचे नमूद करत दोन्ही आयोजकांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्याची शिफारस पोलिसांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने एमआयडीसीने ९ ऑक्टोबर रोजी दिलेली परवानगी रद्द केल्याचे १० ऑक्टोबरच्या पत्राद्वारे रासरंग दांडिया आयोजकांना कळविले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खैरेपाडा येथील गरबा आयोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

