रविवारी पुन्हा परवानगी मिळाल्याची चर्चा; निर्णयामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी
बोईसर, ता. ११: ‘रासरंग’ गरबा कार्यक्रमाच्या परवानगीवरून बोईसर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. काल कार्यक्रमाच्या मंडप उभारणीचे काम थांबविण्याची भूमिका घेतल्यानंतर रविवारी पुन्हा मंजुरी मिळाल्याचे समोर येत असल्याने एमआयडीसी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
खैरेपाडा येथील भूखंडावर गरबा आयोजनासाठी ‘नवरंग’ आणि ‘रासरंग’ या आयोजकांमध्ये जागेवरून वाद निर्माण झाला होता. परवानगी मिळण्यापूर्वीच मंडप उभारणीचे काम सुरू झाल्याच्या मुद्द्यावरूनही चर्चा झाली होती. त्यानंतर प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
मात्र, रविवारी पुन्हा मंजुरी मिळाल्याची माहिती समोर येत असल्याने हा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे. मंजुरीचा अधिकृत आदेश, त्याची वेळ, परवानगीतील अटी आणि आवश्यक नियमांची पूर्तता झाली आहे का, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता येणे आवश्यक आहे.
दरम्यान, हा निर्णय राजकीय दबावामुळे बदलला की आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परवानगी देण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सामान्य नागरिक आणि प्रभावशाली आयोजकांसाठी वेगवेगळे निकष आहेत का? असा सवाल उपस्थित करत संबंधित मंजुरीची कागदपत्रे आणि निर्णयामागील कारणे प्रशासनाने स्पष्ट करावीत, अशी मागणी होत आहे. अधिकृत आदेश आणि संबंधित कागदपत्रे समोर आल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
