राजेंद्र गावित यांच्या मुलाच्या वाहनावरील चिन्हामुळे चर्चेला उधाण; नियमांची अंमलबजावणी कोण करणार?
बोईसर, ता. १० : आमदार नसतानाही आमदाराचे पद दर्शविणारे चिन्ह खासगी वाहनावर लावल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माजी खासदार तथा माजी आमदार राजेंद्र गावित यांच्या मुलाच्या वापरातील असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या थार वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य–आमदार’ असे चिन्ह लावलेले दिसत आहे.

लोकप्रतिनिधींच्या पदाचा सामान्य नागरिकांवर प्रभाव असतो. अशा परिस्थितीत खासगी वाहनावर आमदाराचे अधिकृत पदचिन्ह लावल्यामुळे वाहनाला विशेष शासकीय दर्जा असल्याचा आभास निर्माण होतो का? असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या राज्यचिन्हाच्या वापराबाबत केंद्र सरकारने स्पष्ट कायदे व नियम केले आहेत. अनधिकृत पद्धतीने राज्यचिन्हाचा असा वापर करून ते सरकारशी संबंधित असल्याचा आभास निर्माण होत असल्यास कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
प्रशासन चौकशी करणार का?
या वाहनावर लावण्यात आलेले चिन्ह कोणत्या नियमांतर्गत व कोणाच्या परवानगीने लावण्यात आले आहे, याची संबंधित यंत्रणांनी तपासणी करण्याची गरज आहे. वाहन खासगी असल्यास त्यावर लोकप्रतिनिधीचे पद दर्शविणारे चिन्ह वापरण्याची परवानगी आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडणे अपेक्षित आहे.
आमदार नसताना ‘आमदार’चा लोगो वापरण्याची मुभा आहे का? की हा केवळ पदाचा प्रभाव दाखविण्याचा प्रकार आहे? याचे उत्तर आता संबंधितांकडून मिळणे गरजेचे आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, तर या प्रकरणातही प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
