
वाडा, ता. २७ : तालुक्यातील बेरोजगारी, शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न, रोजगार हमी योजनेची रखडलेली कामे आणि ग्रामपंचायत स्तरावरील कथित भ्रष्टाचाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्वेत स्वराज्य क्रांती पक्षाच्या वतीने वाडा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष साथी सुनील तुकाराम धानवा यांनी व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांना आंदोलनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
वाडा तालुक्यातील गोरगरीब नागरिक, आदिवासी बांधव, शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध समस्यांवर पक्षाने आवाज उठवला आहे. बेरोजगारी, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व मजुरांची खालावलेली आर्थिक स्थिती आणि रोजगार हमी योजनेची रखडलेली कामे यांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाडा पोलीस ठाण्यात आदिवासी नागरिकांविरोधात कथित खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावीत, अशा मागण्या पक्षाने केल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करूनही ठोस तोडगा निघाला नसल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
या विविध मागण्यांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाडा शहरातील व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी बंदमध्ये सहकार्य करावे, असे आवाहनही पक्षाने केले आहे.
