Uncategorized

आठवडा बाजारातील सोन्याची चोरी ४८ तासांत उघड; दोन महिला जेरबंद

बोईसर, ता. २८ : बोईसरच्या शुक्रवार आठवडा बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी परतणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची सुमारे तीन लाख रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरणाऱ्या दोन महिला आरोपींना अवघ्या ४८ तासांत जेरबंद करण्यात बोईसर पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरीस गेलेली संपूर्ण सोन्याची बोरमाळही हस्तगत केली आहे.

सौ. गीता गणपत ठाकूर (७०, रा. नवापूर नाका, बोईसर) या २१ ऑगस्ट रोजी शुक्रवार आठवडा बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी परतत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ चोरून नेली होती. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी तपास करून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासात रज्जाबाई मोहन हतागळे ऊर्फ मांगगारोडी (४७) आणि रेणुका संजय हतागळे (३५) या दोघींचा सहभाग निष्पन्न झाला. दोन्ही आरोपी सध्या संजयनगर झोपडपट्टी, उधना, सुरत येथे राहत असून मूळच्या जळगाव जिल्ह्यातील आहेत.

दोन्ही महिलांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली सुमारे तीन लाख रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ हस्तगत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन नरळे करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखालील बोईसर पोलिस पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *