Uncategorized

पालघर जिल्ह्यात १८ संघटनांची ऐतिहासिक वज्रमूठ; ‘संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण महासंघ’ गठीत

​नानिवलीतील बैठकीत पेसा, जल-जंगल-जमीन आणि संविधानिक हक्कांसाठी सामूहिक संघर्षाचा निर्धार

पालघर, १६ सप्टेंबर :पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन, संविधानिक हक्क आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी जिल्ह्यातील प्रमुख १८ आदिवासी सामाजिक संघटनांनी एकत्र येत ऐतिहासिक वज्रमूठ आवळली आहे. या संघटनांच्या समन्वयातून स्थापन झालेल्या ‘संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण महासंघ, पालघर जिल्हा’ या महासंघाची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक आज नानिवली येथे पार पडली. ‘एक संघटना – एक प्रश्न’ याऐवजी आता ‘सर्व संघटना – एकजूट संघर्ष’ या भूमिकेतून लढा उभारण्याचा एकमुखी निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

​नानिवली येथील शूर झलकारी कातकरी एकता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सवरा यांच्या कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत महासंघाची अधिकृत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

​महासंघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी

​कार्याध्यक्ष-परशुराम चावरे, अशोक शिंगाडा, कांचन काटकर

​महासचिव- विलास वांगड,​सचिव – प्रसाद प-हाड,​उपाध्यक्ष – परेश घाटाळ, महेश घाटाळ, मोहन गुहे, राजन सोनवणे

​जिल्हा समन्वयक, दत्ता करबट, दत्ता सांबरे, ​खजिनदार-विलास सुमडा

​कायदेशीर व संविधानिक मार्गाने लढा

बैठकीत जिल्ह्यातील आदिवासींचे विस्थापन, भूसंपादन, वनहक्क दावे, शिक्षण, रोजगार, आरक्षण आणि ‘पेसा’ (PESA) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. आदिवासींच्या हक्कांवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात कोणत्याही राजकीय द्वेषातून नव्हे, तर संविधानाने दिलेल्या चौकटीत आणि कायदेशीर मार्गाने सामूहिक लढा दिला जाईल, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

​या संघटनांचा महासंघात सहभाग

शूर झलकारी कातकरी एकता महासंघ, आदिवासी अस्मिता, ट्रायबल फोरम, जय आदिवासी युवा शक्ती (जयस), उलगुलान ब्रिगेड, आदिवासी युवा शक्ती फाऊंडेशन, आदिवासी सेना प्रतिष्ठान, आदिवासी क्रांती सेना, राष्ट्रीय आदिवासी सेल, आदिवासी बचाव समिती, आदिवासी मल्हार कोळी संघटना, जोहार आदिवासी बहुउद्देशीय संस्था, इंडियन ट्रायबल चेंबर्स, तारखा फाऊंडेशन (बोईसर), आदिवासी युवा मंडळ (सफाळे), आदिवासी युवा फाऊंडेशन या संघटनांसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाबल्या पाटकर बैठकीत सक्रिय सहभागी झाले.

​आदिवासी समाजातील युवक, महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांनी आपल्या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *