Uncategorized

पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची कुणबी सेनेची मागणी

बोईसर : पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेती, घरे, पशुपालन आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कुणबी सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पूराच्या पाण्याबरोबर शेतांमध्ये दगड, रेती आणि गाळ साचल्याने अनेक शेतीयोग्य जमिनींचे नुकसान झाले असून, कर्ज काढून केलेली भातपेरणी वाहून गेल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनेक गावांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, घरगुती साहित्य आणि विद्युत उपकरणांचे नुकसान झाले असून, पोल्ट्री व्यवसाय, गोठे, पशुखाद्य आणि शेतीपूरक साधनसामग्रीचेही मोठे नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लालठाणे गावात भूस्खलन होऊन शेतजमिनीचे नुकसान झाल्याबरोबरच दोन विहिरी गाडल्या गेल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गावरील अनेक अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांना शेतात पोहोचता आले नाही. त्यामुळे मशागत आणि पेरणी रखडून रावते, बोरशेती, किराट, नागझरी, निहे, लोवरे, धुकटन, बहाडोली, साखरे, नावजे, गिराळे आणि पारगाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा कुणबी सेनेने केला आहे.

शेती, घरे, पशुपालन व पोल्ट्री व्यवसायाच्या नुकसानीची भरपाई, शेतांतील दगड-गाळ हटविण्यासाठी विशेष अनुदान, मोफत बियाणे व कृषी साहित्य, फुटलेल्या बांधांची दुरुस्ती, महामार्गावरील अंडरपासमधील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविणे आणि जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांसमवेत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *