बोईसर, ता. १९: तारापूर औद्योगिक क्षेत्रातून संशयास्पदरीत्या वाहतूक होत असलेल्या रासायनिक घनकचऱ्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील पिंपांमध्ये असलेले रसायन घातक असल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा कचरा कुठून आला, त्याची वाहतूक कोणाच्या आदेशाने झाली आणि त्याची विल्हेवाट कुठे लावली जाणार होती, याबाबतचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

७ मे रोजी बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना एमएच ४३ बीपी ६९२९ क्रमांकाचा ‘श्री कृष्णा रोडलाईन्स’चा ट्रक पोलिसांनी अडवला. चालकाकडे मालासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता समाधानकारक कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन झडती घेतली.
ट्रकमध्ये सुमारे २०० किलो क्षमतेची ८० ते ९० प्लास्टिकची पिंपे आढळली. पिंपांमधून उग्र दुर्गंधी येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत हा माल तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरे ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड येथून आणल्याची माहिती चालकाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी घटनास्थळ तसेच संबंधित उद्योगाची पाहणी करून रासायनिक नमुने घेतले. हे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तब्बल तीन महिन्यांनंतर प्राप्त झालेल्या अहवालात पिंपांमधील रसायन घातक असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी बोईसर पोलिसांना पत्र देऊन संबंधित वाहनचालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. घातक रासायनिक घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करणे आवश्यक असल्याचेही एमपीसीबीने स्पष्ट केले आहे.
घातक कचऱ्याची वाहतूक नियमबाह्य पद्धतीने झाली का? त्यासाठी जबाबदार कोण? कचऱ्याची विल्हेवाट नेमकी कुठे लावली जाणार होती? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासातून समोर येणे अपेक्षित आहे. यापूर्वीच्या पर्यावरणीय त्रुटी आणि उत्पादनबंदीच्या पार्श्वभूमीवर संबंधित उद्योगाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
