पालघर :पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉक्टर किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे असून, संबंधितांवर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत बोलताना शिंदे यांनी पालघरमधील घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून काही चूक झाली असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग उपलब्ध होता. मात्र, कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
कायदा हातात घेणाऱ्यांना शिवसेनेचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. संबंधितांना निलंबित करून पक्षातूनही काढून टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे पालघरमधील या प्रकरणात पक्षाकडून होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
