
बोईसर, ता. १५ : बोईसर रेल्वे स्थानक ते ग्रामपंचायत बोईसरदरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी, बेकायदेशीर रिक्षा व डमडमची गर्दी आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पालघर तालुका कमिटीच्या वतीने शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बोईसर रेल्वे स्थानक ते नवापूर नाका, महेंद्र पार्क आणि ब्लू डायमंड हॉटेल परिसरातील रस्त्यांवर बेकायदेशीररीत्या उभ्या राहणाऱ्या रिक्षा व डमडममुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. त्यातच रस्त्यांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि शुक्रवारच्या आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. परिणामी रेल्वे प्रवासी, पादचारी, शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाया जात असून, दररोजच्या प्रवासात त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही माकपने केला आहे.
अतिक्रमण हटवून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
बोईसर रेल्वे स्थानक ते नवापूर नाका परिसरातील रस्त्यांवरील बेकायदेशीर रिक्षा व डमडमची गर्दी नियंत्रित करावी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण तातडीने हटवावे आणि शुक्रवारच्या आठवडा बाजारासाठी कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करावी, अशा प्रमुख मागण्या माकपने केल्या आहेत.
प्रशासनाने या प्रश्नांवर तातडीने ठोस पावले उचलून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पालघर तालुका कमिटीने दिला आहे.
या आंदोलनामुळे बोईसरमधील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन या समस्यांवर काय उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
