Uncategorized

वाढवण बंदरासाठी भूसंपादनाची जबाबदारी बदलली

डहाणू, पालघर क्षेत्रासाठी नव्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे (CALA) कार्यभार; आतापर्यंत ₹१,८४० कोटींचे निवाडे

पालघर, ता. १४ : वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या (CALA) जबाबदाऱ्यांमध्ये प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. डहाणू क्षेत्रातील भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल खत्री (IAS) यांच्याकडे, तर पालघर क्षेत्राची जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या बदलानुसार जमीनधारकांनी भूसंपादनाशी संबंधित कागदपत्रे सादर करणे, पडताळणी, शंका व चौकशी तसेच पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, भूसंपादन प्रक्रियेत आतापर्यंत ५३१.६४ हेक्टर क्षेत्रासाठी 3D अधिसूचना पूर्ण झाली आहे. त्यापैकी ४८४.१८ हेक्टर क्षेत्रासाठी 3H अंतर्गत रक्कम जमा व देयकाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ३४१.६४ हेक्टर क्षेत्राचा 3E अंतर्गत ताबा NHAIकडे देण्यात आला आहे.

भूसंपादनाच्या अनुषंगाने आतापर्यंत ₹१,८४०.३५ कोटींचे निवाडे जाहीर करण्यात आले असून, त्यापैकी ₹५९६.७६ कोटींची रक्कम वितरित करण्यात आली आहे. सुधारित प्रशासकीय व्यवस्थेनुसार पुढील भूसंपादनाची कार्यवाही संबंधित कायदेशीर तरतुदी आणि विहित प्रक्रियेनुसार सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *