स्थानिकांना रोजगाराच्या संधी; पर्यटनस्थळांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश
पालघर : दाभोसा येथील ग्लास स्कायवॉकमुळे पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळून देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल. यातून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दाभोसा धबधबा परिसरातील ग्लास स्कायवॉकचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

दाभोसासह जव्हार तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश नाईक यांनी दिले. स्कायवॉक परिसरात पार्किंग व पर्यटक सुविधा वाढविण्यासोबतच महिला बचतगटांना पर्यटनाशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक आदिवासी कुटुंबांना ‘होम-स्टे’च्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला.

पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता स्कायवॉकची क्षमता, प्रवेशव्यवस्था, सीसीटीव्ही व गर्दी नियंत्रण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. पर्यटनस्थळांवरील खाद्यपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छतेसाठी नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पालघरला पर्यटन व आर्थिक विकासाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन नाईक यांनी केले.
