पालघर, ता. : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला वेग आला असून, १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ७२.२४ टक्के मतदारांचे गणना प्रपत्र (ईएफ) डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील मतदारांनी या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण २३ लाख ६५ हजारांहून अधिक मतदार असून, त्यापैकी १७ लाखांहून अधिक मतदारांचे ईएफ डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ही प्रक्रिया सुरू असून, उर्वरित मतदारांचे प्रपत्र डिजिटायझेशन करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
एसआयआर कार्यक्रमांतर्गत ‘अनकाउंटेबल’ म्हणून नोंद झालेल्या मतदारांमध्ये मृत, स्थलांतरित, शोधून न सापडलेले तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांचा समावेश आहे. अशा मतदारांच्या नावांची पडताळणी करून संबंधित माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे.
दरम्यान, २४ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीतील माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांनी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा. तसेच मतदार नोंदणीसंदर्भातील अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करता येणार आहेत.
विशेषतः ‘Untraceable/Absent’ अथवा ‘Permanently Shifted’ म्हणून नोंद झालेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी किंवा आवश्यक दुरुस्तीसाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यास सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
