Uncategorized

कुटुंबाला न सांगता अस्वच्छ रुग्णालयात उपचार? व्हिडिओ व्हायरल; कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बोईसर, ता. २१ : तारापूर एमआयडीसीतील सुरू केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीच्या एन-७२ प्लॉटमध्ये पेट्रोलियम जेलीचे गरम द्रव्य उडून तीन कामगार भाजल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिश रजक (२२) याच्यावर सुरुवातीला कुटुंबीयांना न सांगता अस्वच्छ व घाणेरड्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून, यासंदर्भातील तक्रारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हाईट पेट्रोलियम जेली हा कच्चा माल गरम कढईत टाकत असताना अचानक गरम द्रव्य उडाल्याने अनिश रजक, आनंद सिंह आणि रंगदार बाग हे तीन कामगार भाजले. यामध्ये अनिश सुमारे १० टक्के भाजल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यातील नॅशनल बर्न्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

दरम्यान, अनिशच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुलाच्या प्रकृतीची माहिती कुटुंबीयांना वेळेवर देण्यात आली नाही तसेच त्यांच्या संमतीशिवाय अस्वच्छ व घाणेरड्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या तक्रारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंपनीतील सुरक्षा उपाययोजना, अपघातानंतरची वैद्यकीय व्यवस्था आणि जखमी कामगारांबाबतची जबाबदारी यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची संबंधित विभागांनी चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *