Uncategorized

तारापूरच्या घातक रसायनाचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा

बोईसर, ता. २१: तारापूर औद्योगिक क्षेत्रातून कोणतीही आवश्यक कागदपत्रे व अधिकृत परवानगी नसताना घातक रसायनाने भरलेले तब्बल ८० ते ९० ड्रम घेऊन भिवंडीच्या दिशेने निघालेला ट्रक बोईसर पोलिसांनी पकडला. रासायनिक नमुन्यांच्या प्रयोगशाळा अहवालात धक्कादायक प्रमाणात बीओडी व सीओडी आढळून आल्याने हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालक, निल राऊळ आणि संबंधित कंपनीच्या जबाबदार व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोईसर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दादा बाळू शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ मे रोजी दुपारी खैराफाटक कोस्टल चेक पोस्ट येथे नाकाबंदी सुरू असताना एमएच-४३ बीपी-६९२९ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने जाताना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये उग्र वास येणाऱ्या रसायनाने भरलेले सुमारे ८० ते ९० ड्रम आढळून आले.

ट्रक चालक अख्तार अब्दुल हुसेन याच्याकडे रसायन वाहतुकीसाठी आवश्यक बिल, पावत्या अथवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे पोलिस तपासात समोर आले. चालकाने निल राऊळ यांच्या सांगण्यावरून तारापूर एमआयडीसीतील आरे ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स लि., प्लॉट क्र. ई-३४ येथून रसायनाचे ड्रम ट्रकमध्ये भरून भिवंडीला घेऊन जात असल्याचे सांगितले.

पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रसायनाचे नमुने तपासणीसाठी पाठविले. १३ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार संबंधित द्रव्यात बीओडी १,२७,५०० मि.ग्रॅ./लिटर, सीओडी ६,८१,२६४ मि.ग्रॅ./लिटर आणि ऑईल अँड ग्रीस ८२ मि.ग्रॅ./लिटर इतके प्रमाण आढळले. हे द्रव्य घातक स्वरूपाचे असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

घातक रसायनाची अधिकृत मॅनिफेस्ट पद्धतीने, प्राधिकृत वाहनातून आणि मान्यताप्राप्त प्रक्रियाकेंद्राकडे पाठवून शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना बेदरकारपणे वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी अख्तार अब्दुल हुसेन, निल राऊळ आणि संबंधित कंपनीच्या जबाबदार व्यक्तींविरुद्ध बीएनएसच्या कलम १२५, २८१ आणि २८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बोईसर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *