एमआयडीसीकडून जागेचे विभाजन; नवरंगच्या जागेतील मंडप हटविणार का? अध्यक्ष नीलम संखे यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

बोईसर, ता. १० : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील खैरेपाडा येथील मोकळ्या भूखंडावर नवरात्रोत्सवानिमित्त गरबा आयोजनासाठी जागेच्या वाटपावरून निर्माण झालेला वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. नवरंग फाउंडेशनने प्रथम अर्ज करून नियमानुसार शुल्क भरले असताना, दुसऱ्या आयोजकाकडून परवानगी मिळण्यापूर्वीच मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर एमआयडीसीने दोन्ही आयोजकांना जागेचे विभाजन करून दिले असले, तरी नवरंगला देण्यात आलेल्या जागेवर उभारलेला मंडप हटविण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खैरेपाडा येथील भूखंडावर गरबा आयोजनासाठी नवरंग फाउंडेशनसह दुसऱ्या आयोजकानेही जागा घेतली होती. नवरंग फाउंडेशनने प्रथम अर्ज केल्याचा दावा केला आहे. मात्र, दुसऱ्या आयोजकाने परवानगी मिळण्यापूर्वीच मंडप उभारणी सुरू केल्याने जागेच्या वापरावरून वाद निर्माण झाला. यानंतर तारापूर औद्योगिक क्षेत्राकडून दोन्ही आयोजकांना जागेचे विभाजन करून देण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष जागेवर आधीच मंडपाचे काम झाल्याने हा प्रश्न अद्याप कायम आहे.

शनिवार, १० ऑक्टोबर रोजी ठाणे येथील औद्योगिक क्षेत्राचे सर्वेक्षक ठाकरे, अभियंता सय्यद, समाधान राठोड आणि भोईर यांनी संबंधित ठिकाणी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नवरंग फाउंडेशन तसेच दुसऱ्या आयोजकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
‘दुसऱ्याच्या जागेतील मंडप हटविणार’
यावेळी सर्वेक्षक ठाकरे यांना याबाबत विचारले असता, दोन्ही आयोजकांना जागेचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या मंडपधारकाने दुसऱ्या आयोजकाला देण्यात आलेल्या जागेत मंडप उभारला असेल, तर संबंधित मंडप हटविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘नियमानुसार जागा द्या, अन्यथा न्यायालयात जाणार’

नवरंग फाउंडेशनचे अध्यक्ष नीलम संखे यांनी सांगितले की, “आम्ही नियमानुसार पैसे भरले असून सर्वांत प्रथम अर्ज केला आहे. त्यामुळे एमआयडीसीने आम्हाला नियमानुसार तेवढी जागा द्यावी, जेणेकरून कोणताही वाद निर्माण होणार नाही. आम्हाला नियमानुसार जागा मिळाली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ.”

एमआयडीसीने जागेचे विभाजन करून दिल्यानंतरही प्रत्यक्ष मंडप उभारणीच्या कामाचा प्रश्न सुटलेला नसल्याने आता संबंधित जागेतील मंडप हटविण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा वाद सामोपचाराने मिटणार की न्यायालयापर्यंत जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

