Uncategorized

परवानगीपूर्वी मंडप उभारणी; जागेच्या वाटपावरून वाद

बोईसर, ता. ९  : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील खैरेपाडा येथील मोकळ्या भूखंड क्रमांक ४६/२ वर नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळण्यापूर्वीच मंडप उभारणी सुरू केल्याप्रकरणी एमआयडीसीच्या ड्रेनेज उपविभागाने ‘रासरंग दांडिया’च्या आयोजकांना काम थांबविण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, संबंधित भूखंडाचे विभाजन करून नवरंग फाउंडेशन आणि रासरंग दांडिया या दोन्ही मंडळांना जागा देण्यात आली आहे. मात्र, जागेच्या वाटपावरून नवरंग फाउंडेशनने आक्षेप घेतल्याने हा विषय चर्चेत आला आहे.

नवरंग फाउंडेशनने ९ सप्टेंबर २०२६ रोजी एमआयडीसीच्या उपअभियंत्यांकडे गरबा आयोजनासाठी मैदान मिळावे, यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर रासरंग दांडियाच्या आयोजकांनीही २८ सप्टेंबर रोजी जागेसाठी अर्ज सादर केला. तारापूर औद्योगिक क्षेत्राचे उपअभियंता अविनाश सांखे यांनी दोन्ही प्रस्ताव मंजुरीसाठी ठाणे येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगितले.

दरम्यान, रासरंग दांडियाच्या आयोजकांनी १ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भूखंड क्रमांक ४६/२ मधील काही जागा भाडेतत्त्वावर मिळावी, अशी मागणी केली होती. या प्रस्तावाला मुख्यालयाची अधिकृत मंजुरी मिळण्यापूर्वीच संबंधित जागेवर मंडप उभारणीचे काम सुरू झाल्याचे एमआयडीसीच्या निदर्शनास आले. त्यानंतर ड्रेनेज उपविभागाने ७ ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे मंडप उभारणीचे काम तातडीने थांबविण्याचे निर्देश दिले. अधिकृत परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू करावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता.

नवरंग फाउंडेशनचा आधी अर्ज केल्याचा दावा

नवरंग फाउंडेशनने रासरंग दांडियापूर्वीच मैदानासाठी अर्ज केल्याचे सांगत जागेच्या वाटपावर आक्षेप घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांनाही गरबा महोत्सवात सहभागी होता यावे, यासाठी मोफत गरबा तसेच तिकीटविक्रीद्वारे इंडोअर गरबा आयोजित करण्याची संकल्पना फाउंडेशनने मांडली होती. यासाठी सर्वप्रथम एमआयडीसीकडे मैदानाची मागणी केल्याचा दावा फाउंडेशनच्या अध्यक्षांनी केला आहे. त्यानंतर सुमारे १८ ते २० दिवसांनी रासरंग दांडियाने जागेसाठी अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले.

जागावाटपाच्या निकषांबाबत स्पष्टतेची गरज

फाउंडेशनच्या अध्यक्षांनी आपल्या संकल्पनेचे अनुकरण झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांबाबत रासरंग दांडियाच्या आयोजकांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही.

एमआयडीसीने संबंधित भूखंडाचे विभाजन करून दोन्ही मंडळांना जागा दिली असून, नवरंग फाउंडेशनने जागेचे भाडेही भरल्याचे सांगितले आहे. असे असतानाही अपेक्षेप्रमाणे जागा मिळाली नसल्याची खंत फाउंडेशनकडून व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही मंडळांना जागा देताना कोणते निकष वापरण्यात आले, तसेच परवानगीपूर्वी सुरू झालेल्या मंडप उभारणीच्या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, याबाबत एमआयडीसी प्रशासनाकडून स्पष्टता अपेक्षित आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वादात प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *