Uncategorized

एटीएमच्या रांगेत ‘कार्ड बदल्या’चा डाव; बोईसर पोलिसांनी आरोपीला पकडले

बोईसर, ता. १९ : एटीएम केंद्रात हातचलाखीने कार्डची अदलाबदल करून खात्यातील ५० हजार रुपये लंपास करणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी मुंबईतील सांताक्रुझ येथून अटक केली. अफसर अब्दुल गफार खान (वय ३९, रा. सांताक्रुझ, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३८ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

बोईसर येथील सर्कस ग्राउंडजवळ पुरोहित थाल हॉटेलखाली असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बाबुलाल नेमाराम परमार हे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने हातचलाखीने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर आरोपीने संबंधित कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले.

याप्रकरणी परमार यांच्या तक्रारीवरून बोईसर पोलिस ठाण्यात ५ सप्टेंबर रोजी गुन्हा क्रमांक ३६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर सांताक्रुझ येथून त्याला ताब्यात घेऊन १६ सप्टेंबर रोजी पहाटे ४.२६ वाजता अटक करण्यात आली.

या कारवाईत ३८ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय मोरे करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सुनील साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विनय मोरे तसेच बोईसर पोलिस ठाणे व सायबर पोलिस ठाणे, पालघर येथील पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *