Uncategorized

वॉकीटॉकीच्या आवाजाने एटीएम कार्ड लंपास; ९० हजारांची फसवणूक

बोईसर, ता. २३: एटीएममध्ये कार्ड अडकल्याचा बहाणा करून वॉकीटॉकीच्या माध्यमातून महिलेला सूचना देत तिचे एटीएम कार्ड व पासवर्ड मिळवून खात्यातून ९० हजार रुपये लंपास करणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली. जितेंद्र रामदेव पाल (वय २६, रा. कळवा, ठाणे; मूळ उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

१४ सप्टेंबर रोजी समीरा खान या बोईसरच्या शिवाजीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गेल्या होत्या. पैसे काढल्यानंतर त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले. यावेळी एटीएममध्ये लपवून ठेवलेल्या वॉकीटॉकीवरून आरोपीने आपण कॅमेऱ्यातून पाहत असल्याचे सांगून महिलेला पिन तीन वेळा टाकण्यासह अन्य सूचना दिल्या. त्यानंतर मोबाईल क्रमांक लिहून ठेवण्यास सांगून मशीन ऑपरेटर आल्यानंतर कार्ड परत मिळेल, असे सांगण्यात आले.

महिला घरी गेल्यानंतर आरोपीने एटीएममधून कार्ड काढून त्याचा गैरवापर केला. त्यानंतर येस बँकेच्या खात्यातून तब्बल ९० हजार रुपये काढण्यात आले. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला १८ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून फसवणुकीच्या रकमेपैकी ६० हजार रुपये रोख, दोन वॉकीटॉकी संच आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, बोईसर पोलीस निरीक्षक सुनील जाधव व बोईसर पोलिसांनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील साळुंखे करीत आहेत.

बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव काय म्हणाले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *