Uncategorized

सफाळे पूर्व भागातील बंद बसफेऱ्या सुरू; शिवशक्तीचे आंदोलन तात्पुरते स्थगित

पालघर, ता. ६ : सफाळे पूर्व विभागातील अनियमित बससेवेमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीविरोधात शिवशक्ती सामाजिक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत बंद असलेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. बसफेऱ्या नियोजित वेळेनुसार नियमित सुरू करण्याबाबत पालघर विभागीय कार्यालयाने लेखी आदेश दिल्याने संघटनेने आजचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

या प्रश्नावर सोमवारी (ता. ५) विभागीय नियंत्रक कल्याणी ढगे यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सुमारे दोन तास बैठक झाली. नवघर, घाटीम, दहिवळे, उचावली, दारशेत, सोनावे, पारगाव, वरई, ढेकाळे, तांदुळवाडी व खडकोली परिसरातील बसफेऱ्या अचानक रद्द होणे, बस वेळेवर न येणे तसेच वस्तीवरील थांब्यांवर बस न थांबणे, या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

बंद असलेल्या बसफेऱ्या तातडीने सुरू करून त्या नियोजित वेळापत्रकानुसार दररोज चालविण्याच्या सूचना सफाळे आगार व्यवस्थापक व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर विभागीय कार्यालयाने संघटनेला लेखी पत्र देऊन बसफेऱ्या सुरू केल्याचे कळविले.

बससेवा सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक आणि शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठपुरावा केल्याचे संघटनेने सांगितले. तसेच दिनेश पवार यांचेही या प्रश्नासाठी मोलाचे योगदान असल्याचे संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आले.

‘संजयभाईंच्या प्रयत्नांमुळे आंदोलन यशस्वी झाले. रात्री गावागावांत मुक्कामी असलेल्या बस आता वेळेवर सुरू झाल्या आहेत,’ अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. बससेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विभागीय नियंत्रक, संबंधित अधिकारी, सफाळे आगार व्यवस्थापक आणि पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे शिवशक्ती सामाजिक संघटनेने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *