Uncategorized

गरब्याच्या मैदानावर ‘मंडप’राज; परवानगी मात्र गुलदस्त्यात!

बोईसर, ता. ६ (वार्ताहर ) : तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या मालकीच्या जागेवर नवरात्रोत्सवानिमित्त गरबा आयोजनासाठी खैरा पाडा येथील मैदान मिळविण्यावरून बोईसरमध्ये आयोजकांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच, संबंधित जागेवर परवानगी मिळण्यापूर्वीच मंडप उभारण्याचे काम सुरू झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नवरंग फाउंडेशन, बोईसर यांनी गरबा आयोजनासाठी मैदान मिळावे, यासाठी ९ सप्टेंबर २०२६ रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या उपअभियंत्यांकडे अर्ज केला होता. त्यानंतर रास रंग दांडिया या आयोजकांनीही २८ सप्टेंबर रोजी याच मैदानासाठी अर्ज केला. दोन्ही अर्जांवरील प्रस्ताव तारापूर औद्योगिक क्षेत्राचे उपअभियंता अविनाश संखे यांनी आरओ, ठाणे यांच्याकडे परवानगीसाठी पाठविले आहेत.

मात्र, आजपर्यंत कोणत्याही आयोजकाला अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना रास रंग दांडिया आयोजकांकडून संबंधित मैदानावर मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परवानगी मिळण्यापूर्वीच मंडप उभारण्यास सुरुवात कशी झाली, असा सवाल उपस्थित होत आहे.

परवानगी नसताना उभारण्यात आलेल्या या मंडपाबाबत तारापूर औद्योगिक क्षेत्राचे अधिकारी कोणती भूमिका घेतात आणि संबंधित आयोजकांवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

“कोणत्याही आयोजकाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. दोन्ही आयोजकांनी जागेसाठी मागणी केली असून, त्यांचे प्रस्ताव आरओकडे पाठविण्यात आले आहेत. परवानगी देण्याचा निर्णय आरओ स्तरावर घेतला जाईल.”

— अविनाश संखे, उपअभियंता, एमआयडीसी तारापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *