
मच्छीमारांचा सक्रिय सहभाग; प्रकल्पामुळे उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती
वाढवण, ता. २: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात पालघरमध्ये स्थानिकांचा विरोध तीव्र झाला आहे. वाढवण येथे सर्वपक्षीयांच्या वतीने सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
वाढवण बंदर प्रकल्पामुळे परिसरातील मच्छीमार आणि स्थानिकांच्या पारंपरिक उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. त्यामुळे मच्छीमार समाजानेही आंदोलनात सहभाग घेत प्रकल्पाला विरोध दर्शविला. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला.
जेएनपीएच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांच्या जीवनमानावर तसेच मासेमारी व्यवसायावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा फेरविचार करावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक घटकांनी एकत्र येत प्रकल्पाविरोधात भूमिका मांडल्याने आंदोलनाला सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त झाले.
