
वाणगाव, ता. १ :जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले बिबट्यांच्या हल्ल्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून, आज संध्याकाळी वाणगावजवळील चंडीगाव येथे बिबट्याने एका वृद्ध महिलेला ठार केले. बागेत काम करत असताना बिबट्याने अचानक केलेल्या या भीषण हल्ल्यात तुळसी सावर (वय ६५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिला ही विक्रमगड तालुक्यातील सारसी येथील मूळ रहिवासी होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.
महिनाभरात दुसरी बळी; नागरिकांत भीतीचे सावट
पालघर जिल्ह्यात बिबट्यांचा मानवी वस्त्यांवरील वावर कमालीचा वाढला आहे. महिनाभरापूर्वीच पालघर तालुक्यातील वेवूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता चंडीगावमध्ये दुसऱ्या महिलेचा बळी गेल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पालघर, चिंचणी, वाणगाव, तारापूर आणि डहाणू पट्ट्यात गेल्या वर्षभरापासून बिबट्यांचा वावर सातत्याने नोंदवला जात असून, आता थेट नागरी वस्त्या आणि बागांमध्ये नागरिकांवर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन दहशतीखाली आले आहे.
वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; तत्काळ पिंजरे लावण्याची मागणी
केवळ माणसांवरच नव्हे, तर ग्रामीण भागात पाळीव जनावरांवरही बिबट्यांचे हल्ले वाढले असून शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. बिबट्यांचा वावर वर्षभरापासून असतानाही त्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही, यावरून स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी पिंजरे लावून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
