
बोईसर, ता. ८: खैरेपाडा येथील बिरसा मुंडा मैदान परिसरातील एमआयडीसीच्या भूखंड क्रमांक OS-46/2 वर ‘रास रंग’ गरबा आयोजनासाठी मंडप उभारणीचे काम सुरू आहे. मात्र, मंडप उभारणीदरम्यान कामगारांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र दिसून आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंडप उभारणीसाठी काही कामगार उंचावर चढून काम करताना दिसून येत आहेत. यावेळी त्यांच्या हातात बांबू असून, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी हार्नेस यांसारखी सुरक्षा साधने वापरली जात नसल्याचे दिसत आहे. उंचावर अशा पद्धतीने काम सुरू असल्याने अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गरबा कार्यक्रमासाठी या परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे मंडपाची संरचनात्मक मजबुती, विद्युत व्यवस्था, अग्निसुरक्षा, प्रवेश व निर्गमन मार्ग तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची कार्यक्रमापूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे.
मंडप उभारणीपासूनच कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करणे गरजेचे असताना सुरक्षा साधनांशिवाय काम सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याने आयोजकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित प्रशासनानेही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मंडप व संपूर्ण परिसराची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना आहेत की नाही, याची खातरजमा करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
उत्सवाचा जल्लोष कायम ठेवताना कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, अशी मागणी होत आहे.
