Uncategorized

परवानगीपूर्वी मंडप उभारणी; एमआयडीसीचा रासरंग दांडियाला इशारा

बोईसर, ता. ७ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोकळा भूखंड क्रमांक ४६/२ येथे नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी मागण्यात आली असतानाच, परवानगी मिळण्यापूर्वीच मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ड्रेनेज उपविभागाने रासरंग दांडिया, बोईसरच्या अध्यक्षांना पत्राद्वारे काम तातडीने थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

रासरंग दांडिया संस्थेने १ ऑक्टोबर रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक ४६/२ मधील काही जागा नवरात्रोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर देण्याची मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसीच्या ड्रेनेज उपविभागाने प्रस्ताव मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

मात्र, मुख्यालयाची परवानगी अद्याप प्राप्त झालेली नसताना संबंधित भूखंडावर मंडप उभारणीचे काम सुरू असल्याचे एमआयडीसीच्या निदर्शनास आले. त्यामुळे उपअभियंता, ड्रेनेज उपविभाग, तारापूर यांनी ७ ऑक्टोबर रोजी पत्र काढून सदर काम तातडीने थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

‘परवानगी मिळाल्यानंतरच मंडपाचे काम करावे; अन्यथा एमआयडीसीच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल,’ असा स्पष्ट इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परवानगीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मंडप उभारणीच्या कामावरून आयोजकांची अडचण वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *