Uncategorized

उर्से गावात दहा फूट अजगराचा थरार; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू

उर्से, ता. २९ :डहाणू तालुक्यातील उर्से गावातील अंबाडी पाडा येथे शेतकऱ्याच्या अंगणात सुमारे दहा फूट लांब आणि २० किलो वजनाचा अजगर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. कासा येथील सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितपणे पकडून त्याचे रेस्क्यू केले.

मंगळवारी (ता. २९) दुपारी सुमारे एकच्या सुमारास हा अजगर शेतकऱ्याच्या अंगणात कोंबड्या खात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. अजगर दिसताच ग्रामस्थांनी कासा येथील सर्पमित्र विनीत धानमेहेर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर विनीत धानमेहेर, प्रणय धानमेहेर, अंकित केणी, पत्रकार जितू पाटील आणि प्रितेश केणी हे सर्पमित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अजगर लाकडी कुंपणात लपून बसला होता. सर्पमित्रांनी शिताफीने त्याला सुरक्षितपणे पकडले. अजगराचा रेस्क्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

यावेळी सर्पमित्रांनी ग्रामस्थांना सापांबाबत जनजागृती करत परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकाऊ वस्तू साठवून न ठेवता स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. तसेच साप आढळल्यास त्याला मारू नये, तर तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

सर्प बचावाचे सातत्यपूर्ण कार्य

कासा येथील सर्पमित्रांचा समूह डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने सर्पबचावाचे कार्य करत असून, आतापर्यंत हजारो सापांना सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *