सीईओ मनोज रानडे यांची सफाळे येथे दत्तक बालकांच्या घरी भेट

सफाळे, ता. १९ : कुपोषण निर्मूलनासाठी केवळ शासकीय उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक कुपोषित बालकाच्या आरोग्याची प्रत्यक्ष जबाबदारी घेण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून बालके दत्तक घेण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सफाळे येथील ठाणेपाडा अंगणवाडीत दत्तक घेतलेल्या हार्दिक निलेश परेड याची भेट घेऊन त्याच्या आरोग्य व पोषणस्थितीचा आढावा घेतला.
रानडे यांनी हार्दिकचे वजन व उंची तपासून त्याला नियमित पोषण आहार मिळतो का, आरोग्य तपासणी केली जाते का आणि जंतनाशक औषध देण्यात येते का, याबाबत माहिती घेतली. बालकाच्या पोषणात सुधारणा व्हावी यासाठी अंडी व दूध उपलब्ध करून देण्यात येणार असून, पुढील सहा महिन्यांत त्याच्या पोषणस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दर महिन्याला बालकाच्या आरोग्याचा आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रानडे यांनी अंगणवाडीतील बालकांना मोदक तसेच हार्दिक व धनश्रीसाठी सुकामेवा व पौष्टिक खाऊ दिला.
कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यावर भर

बालकाच्या आरोग्यासोबतच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सक्षम होणे महत्त्वाचे असल्याने रानडे यांनी हार्दिकच्या घरी भेट देऊन कुटुंबाकडील जमीन, भातशेती, पालेभाज्यांची लागवड व उत्पन्नाच्या साधनांची माहिती घेतली. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून घरघंटी, शिलाई मशीन, पोल्ट्री शेड, कुक्कुटपालन व पशुपालन यांसारख्या योजनांचा लाभ देता येईल का, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पात्र योजनांचा लाभ देऊन कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर त्यांनी धनश्री पिंटू ठाकरे या कुपोषित बालिकेच्या घरीही भेट देऊन तिच्या आरोग्याची व कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती घेतली. कुपोषित बालकांच्या कुटुंबांना गरजेनुसार शासकीय योजनांशी जोडून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना रानडे यांनी दिल्या.
यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तनवीर शेख, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
