बोईसर, ता. २५ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्स कंपनीच्या प्लॉट क्रमांक ६० च्या बाहेरील परिसरात रिअॅक्टर तसेच मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या हद्दीबाहेर औद्योगिक साहित्याचा असा साठा करण्यात आल्याने परिसराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रस्त्यालगत रिअॅक्टर व भंगार साहित्य दीर्घकाळ पडून असल्याने अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. या साहित्याच्या साठवणुकीसाठी संबंधित विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, तसेच कंपनीबाहेर हे साहित्य ठेवण्यामागचे कारण काय, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणाची संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. तपासणीनंतरच ही साठवणूक नियमबाह्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, कंपनी प्रशासन या साहित्याबाबत कोणती भूमिका घेते आणि ते हटविण्यासाठी काय पावले उचलते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
