जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासह शिक्षण, रोजगार व आरक्षणासाठी संघटित लढ्याचा निर्धार

कासा, ता. १४ : पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन, रूढी-परंपरा, संस्कृती, शिक्षण, रोजगार, आरक्षण आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी विविध आदिवासी सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. कासा येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात १२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत ‘संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण महासंघ, पालघर जिल्हा’ या महासंघाची स्थापना करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पारंपरिक हक्कांचे संरक्षण, बेकायदेशीर जमीन हस्तांतरण व अतिक्रमणाला विरोध, आदिवासी संस्कृती व भाषेचे जतन, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिष्यवृत्ती, युवकांना रोजगार आणि आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विकास प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन व भूसंपादन, तसेच आदिवासी भागातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज आणि अन्य मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धारही महासंघाने व्यक्त केला.
बैठकीला रमेश सवरा, विलास वांगड, प्रसाद प-हाड, अशोक शिंगाडा, निता काटकर, प्रकाश पाटकर, मोहन गुहे, प्रकाश सावर, अजय तुंबडा, महेश घाटाळ, प्रभाकर शेलार, सिलींद लहांगे, राजन सोनावणे, विलास सुमडा, जतीन वरठा, रमेश गोरेकर आणि किशोर काटकर यांच्यासह विविध संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
‘आदिवासी हक्कांसाठी एकत्र, न्यायासाठी संघर्ष आणि समृद्ध भविष्यासाठी संघटन’ असा निर्धार व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजबांधवांनी हक्कांच्या संरक्षणासाठी संघटित होण्याचे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले.
