परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; कारवाई उद्यापासून सुरू

पालघर, ता.१९: राज्यातील रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ही कारवाई उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिक्षाचालकांनी स्थानिक प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा येत नसल्यास संबंधित रिक्षाचालकाला प्रथम नोटीस देण्यात येणार असून, त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत. राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकून व्यवहारात वापरावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयामुळे रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली असून, उद्यापासून सुरू होणाऱ्या कारवाईकडे मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षाचालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
