पालघर पोलिसांची गुजरातमध्ये सापळा रचून कारवाई
वाडा, ता. २५ : ज्येष्ठ महिलेसह इतर महिलांना वाहनात बसवून जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अवघ्या दोन तासांत जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले. आरोपींकडून १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त करण्यात आली आहे.
केळीचापाडा-मांडा येथील ७२ वर्षीय भारती भास्कर पष्टे या रविवारी (ता. २४) सकाळी इतर तीन महिलांसह कंचाड येथे जाण्यासाठी उभ्या होत्या. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या चार जणांनी महिलांना वाहनात बसविले. प्रवासादरम्यान आरोपींनी पष्टे यांच्या डोक्यात मारहाण करून गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने खेचली. त्यानंतर त्यांना वाहनातून बाहेर ढकलून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली मोटार गुजरातच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. वलसाड स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने वलसाड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंदलावू पुलाजवळ सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपींमध्ये मुजम्मिल अश्फाक सवानी (२९), अश्फाकअली ऊर्फ बब्बुक मेहबुबअली सय्यद, सुफियान नाजीम शेख (२२) आणि आसिफा ऊर्फ हिना अमजद पठाण (२८) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सुरत परिसरातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेली १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी समीर महेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील व त्यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास वाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हिमतराव सरगर करीत आहेत.
