
बोईसर/पालघर : सूर्या नदीच्या महापुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाटबंधारे विभागाच्या कथित निष्काळजीपणावर पूरग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालघरचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देत संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा सुमारे १० ते १२ तास आधी दिला होता. मात्र, त्यानुसार धरणातील पाण्याचा टप्प्याटप्प्याने विसर्ग न करता अतिवृष्टी सुरू झाल्यानंतरच मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सूर्या नदीकाठच्या गावांमध्ये महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांची घरे, शेती तसेच शेतीपूरक व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पूरग्रस्तांच्या मते, हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार योग्य नियोजन झाले असते, तर पूराचा धोका आणि नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता आले असते. याशिवाय, पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध मोठ्या प्रकल्पांमुळे नैसर्गिक जलवाहिन्या आणि पाण्याचे मार्ग अडवल्याने पूरस्थिती अधिक गंभीर होत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
“आम्ही भूमिपुत्र म्हणून पिढ्यानपिढ्या नदीकाठावर वास्तव्यास आहोत. प्रशासनाच्या बेजबाबदार नियोजनाचा फटका आम्हाला वारंवार बसत आहे. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून सुधारित पूरनियोजन राबवावे,” अशी मागणी समस्त पूरग्रस्तांनी केली आहे.

तसेच, पालकमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी अपेक्षाही पूरग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
