Uncategorized

मृतदेहही पुराच्या पाण्यातून! धुंदलवाडीत प्रशासनाची पोलखोल

डहाणू : जिवंतपणी मूलभूत सुविधांचा अभाव आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही संघर्ष! धुंदलवाडी येथे ४० वर्षीय सुनील मुकणे यांचा मृतदेह वाहत्या पाण्यातून नदीपार नेतानाचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. पावसाळ्यात स्मशानभूमी पाण्याखाली जात असल्याने मृतदेह दफन करण्यासाठी ग्रामस्थांना नदी ओलांडण्याची वेळ आली आहे.

शासनाने उभारलेली स्मशानभूमीच नदीपात्रात असल्याने पावसाळ्यात ती निरुपयोगी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकूड उपलब्ध होत नसल्याने मुकणे यांच्या कुटुंबीयांवर मृतदेह जमिनीत पुरण्याची वेळ आली. मात्र, दफनभूमीकडे जाण्यासाठी नदी पार करावी लागल्याने ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यातून मृतदेह नेला.

मृत्यूनंतरही मृतदेहाची अशी विटंबना कधी थांबणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने नदीवर तातडीने साकव बांधून कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पावसाच्या पाण्यात माणुसकीची परीक्षा घेणारी ही घटना प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *