Uncategorized

विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘एक शाम : देश के नाम’चा जल्लोष

बोईसर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवारी ‘एक शाम : देश के नाम’ या भव्य सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्ती, भारतीय संस्कृती, वीरता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या विविध कलाविष्कारांनी कार्यक्रम रंगला.

जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पालघरचे खासदार व संसद रत्न पुरस्काराने सन्मानित डॉ. हेमंत सवरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विराज इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जयंत हरि हरलाल, प्राचार्य डॉ. देव बसीठा उपाध्याय, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांशी यांच्या घुंघरूंच्या भावपूर्ण सादरीकरणाने झाली. त्यानंतर प्राचार्यांचा राष्ट्रभावनेने ओतप्रोत काव्यपाठ, ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरी भारत की बेटी’, ‘तेरा हिमालय आकाश छू ले’ आणि ‘माँ तुझे सलाम’ आदी देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते श्री. भिकल्या धिंडा यांच्या सन्मान सोहळ्याचे. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवास व योगदानावर आधारित विशेष प्रस्तुतीनंतर त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विराज इंटरनॅशनल स्कूलतर्फे त्यांना एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर धिंडा यांनी विशेष संगीतमय प्रस्तुती सादर केली.

‘भारत एक खोज : भारताची सांस्कृतिक यात्रा’ या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी काश्मीर, आसाम, उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रातील लोककला व सांस्कृतिक परंपरांचे मनोहारी दर्शन घडविले. विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाच्या प्रगतीत युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. देव उपाध्याय यांनी ‘एक शाम : देश के नाम’ हा विद्यार्थ्यांच्या राष्ट्राप्रती कृतज्ञतेचा आविष्कार असून, स्वातंत्र्य हा केवळ अधिकार नसून मोठी जबाबदारी असल्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.

विद्यार्थी, शिक्षक व विद्यालय परिवाराने सादर केलेल्या ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या सामूहिक प्रस्तुतीने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर राष्ट्रगानाने कार्यक्रमाचा गरिमापूर्ण समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *