पालघर : तलासरी तालुक्यात १९ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने तलासरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून डाग बंगला परिसरातील निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसांना सहा संशयितांची नावे सांगितली असून, त्यापैकी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तलासरी येथे भेट देऊन प्रकरणाचा तपास व पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा आढावा घेतला. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे तलासरीसह पालघर जिल्ह्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, निर्जन भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढविण्याची मागणी होत आहे.
