‘प्रकल्प रद्द करा’चा तिरंगा एल्गार; पंचक्रोशी एकवटली

पालघर : प्रस्तावित दातिवरे-कोरे विमानतळ, एसार (एमआयडीसी), टेक्स्टाइल पार्क तसेच वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तिरंगा बाईक रॅली काढली. शेकडो दुचाकींवरून हजारो नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.

दातिवरे, कोरे, एडवण, मथाणे, भादवे, उसरणी, चटाळे, मधुकरनगर, दांडा-खटाळी, केळवे, आगरवाडी, सफाळे आदी गावांतील नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी प्रस्तावित प्रकल्पांविरोधात घोषणाबाजी केली. ‘एकच जिद्द, दातिवरे-कोरे विमानतळ, एसार (एमआयडीसी), टेक्स्टाइल पार्क आणि वाढवण बंदर रद्द’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

प्रस्तावित प्रकल्पांमुळे गावांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावागावांत जनजागृती करून नागरिकांना एकत्र आणणे आणि प्रकल्पांना असलेला विरोध शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. भविष्यात ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मोठे आंदोलन उभारण्याची भूमिकाही आयोजकांनी मांडली. विशेषतः तरुण-तरुणींचा रॅलीतील सहभाग लक्षणीय होता.

