बोईसर, ता. १२ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक J-174 येथील समृद्ध फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करताना मशीनमध्ये हात गेल्याने २६ वर्षीय कामगाराच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सोनीक मेहेर (रा. मुरबे) असे जखमी कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर मेहेर यांना उपचारासाठी बोईसर येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास मुंबईतील ओखाड रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेमुळे कंपनीतील यंत्रसामग्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यंत्रावर आवश्यक सुरक्षा कवच, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कामगारांना देण्यात येणारे सुरक्षा प्रशिक्षण यांची पुरेशी अंमलबजावणी झाली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघाताच्या अधिकृत चौकशीनंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
