
बोईसर : नानिवली (घरत पाडा) येथे युवा गणेश मंडळ व महिला गौरी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त फॅन्सी ड्रेस व विविध मुखवटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला लहान मुला-मुलींसह महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत चिमुकल्यांनी विविध वेशभूषा साकारत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पारंपरिक नृत्याचेही आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.
नानिवली गावात आजही गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा जपली जात आहे. महिला, मुले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी होत असून, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या अखेरीस गणपती व गौरीचे एकत्रित विसर्जन पारंपरिक नृत्य आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात येते. या पारंपरिक सोहळ्याची ग्रामस्थांमध्ये विशेष उत्सुकता असते.
